Friday, June 28, 2019

मंत्र तीन अक्षरांचा


"एक क्षणिक लाट आपल्या देशाला वाहून काढते  आणि आपण  कल्पना करतो  कि आपल्यात भक्कम एकी तयार झाली आहे. पण आपल्या समाजात असलेली छिद्रे व भगदाडे आपले काम गुप्तपणे करत  असतात आणि आपण कोणतीही चांगली  कल्पना जास्त काळ जवळ बाळगू शकत नाही. शिवाजीचे ध्येय  होते ही सर्व छिद्रे मुजवण्याचे. त्याची तीव्र इच्छा होती मुघल आक्रमणापासून अशा हिंदू समाजाला वाचवायची जो प्रत्येक श्वासागणिक जातिभेद मानण्यात आपला गौरव समजतो. अशा विषमतेने भरलेल्या समाजाने  संपूर्ण भारतावर विजय  मिळवावा असे त्याला वाटत होते. त्याने वाळूचे दोर बनवायला बघितले आणि अशक्यकोटीतील प्रयत्न केले. हे कोणत्याही मनुष्याच्या शक्ती पलीकडील होते. निसर्गाच्या दैवी नियमाच्या विरुद्ध पण होते, जातीवर आधारीत दुभंगलेल्या व अंतर्गत भगदाडे पडलेल्या समाजाने भारतासारख्या खंडप्राय देशावर स्वराज्य स्थापन करणे."  हे उद्गार दुसऱ्या कोणाचे नसून कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे आहेत. यातुन  आपल्याला जाणवते ती  म्हणजे भारताची सामाजिक परिस्थिति आणि शिवाजी महाराजांनी मनाशी बाळगलेली  असामान्य महत्वाकांक्षा.  महाराजांनी मुघल, आदिलशाह, निजाम, पोर्तुगीज, सिद्धी व इंग्रज अशा एकापेक्षा एक बलाढ्य शत्रूंशी लढत आपले स्वराज्य स्थापन केले म्हणुनच त्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

अठरापगड जाती मध्ये दुभंगलेल्या आपल्या समाजातील मावळ्यांना बरोबर घेत अत्यंत धाडसाने आणि नियोजनबद्ध  पद्धतीने एकेक शत्रूला पाणी पाजत महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले होते ज्याचा ६ जून  १६७४ रोजी राज्याभिषेक पार पडला. पठाणांनी देवगिरीची  व आदिलशाहने विजयनगर साम्राज्याची राखरांगोळी  केल्यानंतर  स्वतःचा राज्याभिषेक करून गादीवर बसणारा पहिलाच हिंदू राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यावेळी हिंदुस्तानात कोणतीही छोटी गोष्ट  आलमगीर औरंगझेबाच्या परवानगी शिवाय करता येत नसायची  त्या काळात एक स्वतंत्र राज्य निर्माण करून स्वतःला सार्वभौम राजा  घोषित करणे हे काम भारतातल्या कोणत्याही हिंदू राजाला शक्य झाले नव्हते. त्यामुळेच महाराजांचा राज्याभिषेक हा एक देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून कोरला गेलेले आहे. आपला पहिला स्वातंत्र दिन.

सैन्यदलातील कार्यक्षमता, तिचा वेग, सैनिकांचे कल्याण, सैनिकांनी शत्रूचा लुटलेला माल जसाच्या तसा खजिन्यात जमा करणे, लहानातील लहान माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेरांचे जाळे देशभर पसरवणे यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवले होते. स्वतः जन्मजात योद्धा असल्यामुळे धक्कातंत्र , गनिमी कावा , वेग या तीन तंत्रांच्या आधारावर आपली युद्धनीती यशस्वी करत होते. अफझलखानची भेट - प्रतापगडाचे युद्ध, पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटणे, शाहिस्तेखानवर हल्ला, कारतालबखानचा पराभव आणि आग्र्याहून सुटका हे महाराजांच्या जीवनातील जीवावरचे प्रसंग आजही भारतीय सेनेच्या प्रशिक्षणामध्ये शिकवले जातात.

शिवाजी महाराजांची महानता त्यांनी किती भूभाग जिंकला किंवा किती खजिना सोडून गेले यात नक्कीच मोजता येणार नाही. ज्या काळामध्ये मुघल साम्राज्य अत्यंत शिखरावर होते व हिंदुस्तानच्या कोणत्याही कोपऱ्यातून होणार विरोध अक्षरशः ठेचून काढला जायचा त्याकाळात कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका जमीनदाराच्या मुलाने स्वतः नवीन वाटा धुंडाळत नवीन राज्य स्थापने  हे कल्पनेच्या बाहेरचे होते. स्वतःच्या मर्यादा ओळखून तसेच पद्धतशीरपणे राजकारण करून अत्यंत मुत्सद्दीपणाने योजना आखत त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. चेहरा पाहून  माणसाला ओळखायची असाधारण शक्ती अवगत असल्याने कोणत्या व्यक्तीला कोणती जबाबदारी द्यायची हे देखील आत्मप्रेरणेने त्यांनी केले. राजा जवळ नसला तरी आखून दिल्याप्रमाणे कार्य करायचे प्रशिक्षण महाराजांनी त्यावेळच्या असंघटित मराठ्यांना दिले. म्हणूनच शंभूराजांनी नऊ वर्षे व त्यांच्या बलिदानानंतर १८ वर्षे औरंगझेबासारख्या अलामगिराशी मराठ्यांनी लढा दिला आणि याच मातीत त्याला संपवले.

शिवाजी महाराजांच्या चारित्र्याबद्दल नेहमीच लिहिले गेले आहे. काफी खान सारख्या शत्रूच्या लेखकाला पण त्यामध्ये दुर्गुण आढळला नाही. प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी म्हणलंय  की "शिवाजी हा बालपणापासूनच धार्मिक पण अंतःप्रेरणेवर व प्रशिक्षणावर आधारित कार्य करणारा, अध्यात्मिक ग्रंथ - गोष्टींची आवड असणारा, आहारावर नियंत्रण ठेवणारा, वाईट गोष्टींपासून दूर असणारा व महापुरुषांना सन्मानाने वागवणारा होता. धर्म किंवा अध्यात्म हा एक ऊर्जेचा धबधबा म्हणून व सर्वांना उदारतेने व ममतेने वागण्यासाठी  त्याने वापरला. त्यामुळे शिवाजी कधी धर्मांध झाला नाही. हिंदू व मुसलमान अशा सर्वच संतांना त्याने आदराने वागवले. त्याचप्रमाणे आपल्या सैन्यात नैतिकतेचा महत्वाचा नियम घालून दिला. त्यालाच अनुसरून कोणत्याही धर्माच्या स्त्रीला, संतांना, धर्मग्रंथांना  सन्मानाने वागवायचा आदेश काढून त्याची नेहमीच अंमलबजावणी केली."

शिवाजी महाराजांचे यश हे त्यांच्या नैतिक अधिष्ठानावर आधारित आहे.  जातपात विरहित तसेच धर्मनिरपेक्षपणाने केलेला राज्यकारभार हेच महाराजांचे कल्याणकारी राज्य. शेतकरी व सैन्य यांच्या भल्यासाठी सदैव दक्ष असणाऱ्या या राजाने स्वाभिमानाचा मंत्र रयतेत रुजवला. आपल्याला आजपण ताठ कण्याने व अभिमानाने जगता  येण्यासाठी 'शिवाजी' या तीनच अक्षरांचा मंत्र पुरेसा आहे. 

********

No comments:

Post a Comment